Friday, July 31, 2020

सुक्यो गजाली . . .


          

म्हातारेचो बूट ते प्लॅस्टिक चपला !

ठरल्याप्रमाणे बाबी काका इलो आणि सुटयेत कंटाळलेल्या आबाक घेवन मुंबैक गेलो. बाबीकाका म्हणजे इरसाल आणि चिकटो मुंबैकार! आबा पयलोच मुंबैक गेल्लो. बाबी काकान तेका म्हातारेच्या बूटापासून, सत्तावीस मजली उषाकिरण बिल्डिंगपर्यंत सगळा फिरवन दाखयल्यान, 'आबा, आता तू कॉलेजात शिकतलय. लांब पॅंटीर बूट घालूचे आसतत, म्हायत आसा मा? . . . चल बूट घेवया तुका!'

आबा ज्याम खूष झालो! दोघय बाटाच्या शो-रुमात घुसले. बूटांचे दर साडेसात रुपयांपासून वीस रुपयांपर्यंत बघून बाबीकाकान आंग काढून घेतल्यान. चपलांचे दर विचारुक सुरवात केल्यान. तीन रुपयांपासून सात रुपयांपर्यंत चपलांचे दर. 

'एका बूटाच्या किंमतीत चपलांचे तीन जोड येतले, नाय रे आबा?' . . . काकाचा गणित आयकान आबाचा पडलाला त्वॉंड परत खुलला! 'आबा हिच चपला दादराक स्वस्त गावतत,' असा सांगून बाबी काका आबासकट दुकानातसून भायर पडलो.

दोघय फिरत फिरत दादरच्या फूटपाथवर इले. थय रबरी, प्लॅस्टिक, चामड्याच्या चपलांचे ढिग लागलले. थय बाबीकाकान दर काढूक सुरवात केल्यान, 'मी काय म्हणतय आबा, नायतरी आता पावसाळो सुरु जातलो. बूट, चामड्याची चपला टिकाची नाय, खराब जातली. दिवाळेच्या  सुटयेत परत मुंबैक ये, तेवक्ता तुका बाटाचे बूट घेवया!' असा पटयत बाबी काकान बाराण्याची प्लॅस्टिकची चपला आबाक बहाल केल्यान!

बिचारो आबा! सकाळी म्हातारेच्या बूटात खेळलो आणि संध्याकाळी प्लॅस्टिकची चपला मिरयत घराक परातलो!

उडाणटप्पू

No comments: