Monday, July 27, 2020

आठवणी: काही कटू काही गोड . . .

अतीवृष्टी आणि त्या दोन रात्री (१९९४ ऑगष्ट)

ऑगष्ट १९९४! सालईवाड्यातील जिल्हापरिषद शाळा क्र. ३ समोर असलेल्या छोट्या खोलीतील सकाळ दैनिकाचे माझे कार्यालय, आम्ही पाडगावकर बिल्डिंग (आता तिथे हॉटेल मॅंगो आहे) मध्ये शिफ्ट केले. त्याचवेळी दैनिकाचे कामही सुरुच होते. बातम्या कव्हर करणे, त्या लिहिणे, जिल्ह्यातून येणा-या इतर बातमीदारांच्या बातम्या संपादित करणे, संगणकावर टाइप करुन घेणे, प्रुफ वाचणे, अधूनमधून संपादकांशी चर्चा, असे दैनंदिन व्यवहारही सुरुच होते. टेलिफोन शिफ्टिंगसह तत्सम महत्वाची कामे ओळखीमुळे चुटकीसरशी पार पडली. रात्री दहाला माझी कामे आटोपून घरी गेलो.

 तेव्हा आम्ही जुनाबाजार रोडवर बालोद्यानासमोर, पूजा बार शेजारी, ख्रिश्चनच्या घरात राहत होतो. घर खूप जुने, मातीच्या भिंती व जमीन, कौलारु छप्पर असे होते. दिलीप प्रभावळकरना ते आवडायचे, ते अनेकदा त्या घरी यायचे.

तर त्यादिवशी दिवसभर पाऊस कोसळतच होता, रात्री जोर अधिकच वाढला. घरी जेवलो. दिवसभरच्या कामांनी खूप दमलो होतो. मी मुख्य खोलीत खाली जमिनीवर रस्त्याकडच्या भिंतीकडे पाय करुन झोपायचो. पायाकडे असलेल्या कॉटवर आपा (माझे वडील) तर माझ्या डोक्याकडे थोड्या दूर असलेल्या कॉटवर आई झोपायची. आपा झोपायचे त्या भिंतीपलिकडे सखल भागात एका मुस्लिम फॅमिलीचे असेच जुने चंद्रमौळी घर. त्यापलिकडे तो जुन्या बाजारात जाणारा रस्ता.

झोपण्यासाठी अंथरुणावर आडवा झालो, लक्ष साहजिकच छपराकडे गेले. समोरच्या भिंतीला असलेली चिर थोडी रुदावलेली दिसली. तिचे भेगेत रुपांतर झाले होते. शंका आली. आपांना दाखवलं, तेही चिंतेत पडले, आई उठून बसली. आमची गडबड ऐकून प्रदीप (मोठा भाऊ)
आतल्या त्याच्या खोलीतून बाहेर आला. भेग अधिकच वाढली.

 आपांनी त्यांच्या कॉटवरचे साहित्य, शेजारीच असलेला टिव्ही उचलला, तोवर मी अणि प्रदीप, त्याच्या शिरोडा नाक्यावरील घराचे बांधकाम करणा-या, म्हापणकर नावाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या, जेलजवळ असलेल्या घरी निघालो. तो भेटला. कामगाराना घेऊन येतो म्हणाला.

आम्ही घरी परतलो. सर्वत्र काळोख. बॅटरीच्या उजेडात घरातले सगळे बाहेर दिसले. धावतच पुढे गेलो. रस्त्याच्या दिशेची ती अवाढव्य भिंत शेजारच्या घरावर कोसळली होती. पण वेळीच आपांनी त्या कुटुंबाला सावध केल्याने, त्यांचा जीव वाचला. तशाही स्थितीत मी घरात घुसलो. आपा झोपत त्या कॉटवर छप्पराची तुळई छपरासह कोसळली होती. अर्धे छप्पर तग धरुन होते. घरात पावसामुळे चिखल झाला होता. पाऊस अविरत कोसळतच होता. उर्वरीत रात्र शेजारच्या दुस-या घराच्या ओसरीवर काढली.

सकाळी उजाडल्यावर घरभर फिरलो. घर राहण्याच्या लायकीचे राहिले नव्हते, शोकेस आतील सामानासह चिखलात मिसळली होती.  माझी गणिताची पुस्तके, माझी लेखांची कात्रणे, वर्तमान पत्रासाठी सतत लागणारी संदर्भ पुस्तके, कॅसेटसचाही चिखल झाला होता. वाचलेले व सुके राहिलेले साहित्य, शेजारच्या त्या दुस-या घरात हालविले. नगरपालिका, तहसिलदार कार्यालयाचे अधिकारी न कळवताच येऊन पंचनामा करुन गेले. 

पाऊस थोडा कमी झाला होता. मी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेलो. दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढला. रात्रभराच्या जागरणाने डोळे चुरचुरत होते. जिल्हाभरातून पावसाच्या बातम्यांचा पाऊस पडत होता, फोटोंचा खच पडत होता. फॅक्स आणि कॉम्प्युटरला उसंतच नव्हती. संध्याकाळी उशिरा प्रदीपचा फोन आला, 'आम्ही नवीन घरी जात आहोत. आवश्यक साहित्य हालविले आहे, तू काम आटोपल्यावर थेट तिकडेच ये.'  मला विचार करायलाही वेळ नव्हता, तरीही रात्री लवकर म्हणजे नऊ वाजेपर्यंत काम आवरले.

 माझी तेव्हा कायनेटिक होंडा होती. चुकून जुन्याच घराच्या दिशेने वळली, विट्ठल मंदिरच्या रस्त्याला वळतांनाच भानावर आलो. अबाऊट टर्न केले आणि सालईवाड्याच्या दिशेने निघालो. पाऊस वाढतच होता. मिलाग्रीसजवळ आलो आणि चाक पंक्चर. समोर गजा नाटेकर रहायचा, तो धावतच आला. त्याच्या मदतीने चाक बदलले. रेनकोट असूनही नखशिखान्त भिजलो होतो.

जुन्या शिरोडा नाक्याच्या पुढे आलो. प्रदीपच्या (आताचे सर्वोदय नगर/शिक्षक कॉलनी) घराच्या रस्त्याला वळलो. रस्ता कच्चा होता, (आमदार विजय सावंत माझे खास मित्र, त्यांच्या आमदार फंडातून मी नंतर तो डांबरी करुन घेतला) त्या भागात आज शेकडो बंगले उभे राहिलेत, पण तेव्हा मध्ये मध्ये असे दोन चार पूर्ण झाले होते, काहींची कामे सुरु होती. खोजाली (ख्वाजा अली) बाग या नावाने ओळखल्या जाणा-या त्या भागात वीज नव्हती. (ती देखील वीजमंत्र्यांचा दबाव आणून मी गणेशोत्सवाआधी त्या भागात आणली.) त्या कच्च्या रस्त्यावर पुढे डबर (मोठे दगड) पसरलेले होते. त्यावरुन मी कसाबसा स्कूटर हाकत होतो.

 जवळपास दोनशे मीटर अंतर कापले असेस नसेल, अचानक माझी स्कूटर त्या दगडांमधल्या खड्ड्यात फसली आणि बंद पडली. सगळीकडे मिट्ट काळोख, काहीच दिसत नव्हते त्यात आभाळ फाटल्याप्रमाणे धो- धो पाऊस ओततच होता. प्रदीपचे घर किती अंतरावर आहे, त्याचा त्या काळोखात काहीच अंदाज येत नव्हता. 
 
मी मोठमोठ्याने प्रदीपच्या नावाने हाका मारु लागलो, पण पावसाच्या आवाजापुढे माझा आवाज फारच क्षीण वाटत होता. स्कूटर ढकलायला माझी ताकद अपुरी पडत होती. मी ओरडून ओरडून थकलो. गाडी तशीच सोडून जाताही येत नव्हते. तितक्यात अंधारातून कोणीतरी आला. त्याने स्कूटर खड्ड्यातून बाहेर काढून दिली. मी चालू करण्याच प्रयत्न केला. थोड्याशा प्रयत्नाने ती सुरु झाली. मी कसाबसा प्रदीपच्या घरी पोहचलो. तिथेही वीज नव्हतीच. नंतरचा आठवडाभर काळोखात, इमर्जन्सी लाईट, मेणबत्त्यांच्या उजेडात काढला.

दुस-या दिवशी सकाळी पुन्हा ऑफिसला निघालो तेव्हा रात्री मी कुठे अडकलो, त्याचा अंदाज घेतला आणि काळजाचा ठोकाच चुकला. तिथे पाणी जाण्याची वाट होती आणि त्याचे छोट्या ओढ्यात रुपांतर झाले होते. मला स्कूटर खड्ड्यातून काढून देणारा तो कोण होता? तिथे कोणाचे घरही नव्हते, दूर कामगारांची झोपडी मात्र दिसत होती.

अरविंद शिरसाट

1 comment:

Unknown said...

Old memories. Vachun junya athvani jagya zalya. Sagle dolya samor disu lagle. Chan likhan Arvind.