Saturday, August 8, 2020

आठवणी: काही कटू काही गोड . . .

 

जॉर्ज फर्नांडिसांची ती मुलाखत . . . !


बहुधा २० जानेवारी १९९५. या दिवशी कोल्हापूरच्या 'सकाळ'ने कोकण रेल्वेवर एक पुरवणी केली होती. त्यात माझे काही लेख व छायाचित्रे होती. या संपूर्ण मार्गाचा मी आणि माझे एक वरीष्ठ वृत्तसंपादक संजय पाटोळे यांनी दौरा केला होता. रेल्वेच्या सगळ्या प्रमुख अधिका-यांशी चर्चा केली होती. माझ्याकडे जॉर्ज फर्नांडिस यांच्या विशेष मुलाखतीची जबाबदारी होती. त्यासाठी गरज भासल्यास दिल्लीला विमानाने जाण्याच्याही सूचना होत्या. पण त्याच काळात जॉर्ज मुंबईत एका कामगार मेळाव्यासाठी येणार असल्याचे समजले. मी आधीच एक दिवस मुंबईत पोहचलो. 


मुंबई सकाळ कार्यालयात जाऊन जॉर्ज च्या दौ-याचा तपशिल मिळवला. त्यानुसार जॉर्ज रात्रीच मुंबई कौन्सिल कामगार युनियनचे नेते शरद राव यांच्या फ्लॅटवर येऊन मुक्काम करणार असल्याचे कळले. मुंबई सकाळचे तेव्हाचे संपादक राधाकृष्ण नार्वेकरांनी, मला सोबत त्यांच्या एका नव्या स्टाफ रिपोर्टरला, नेण्यास सांगीतले. त्याने फक्त सोबत थांबावे व ऐकावे, अशा त्याला सूचना होत्या.


ठरल्याप्रमाणे मी व तो पत्रकार सकाळीच शरद रावांचा फ्लॅट असलेल्या इमारतीखाली भेटलो. शरद रावांचा फोन नंबर आधीच मिळवला होता, त्यांना कॉल केला. जॉर्ज मिटिंगमध्ये असल्याचे त्यांनी सांगीतले. पुन्हा थोड्या वेळाने केला, पुन्हा तेच उत्तर. तिस-यांदाही तोच अनुभव. मग मी वेगळी युक्ती केली. जॉर्जनी जुन्या समाजवादी मंडळींशी फारकत घेतली होती. तरीही दंडवतेंशी त्यांचे संबंध बरे असणार अशी माझी अपेक्षा होती. मी पुन्हा फोन केला आणि जॉर्जना दंडवतेंचा निरोप द्यायचा आहे, असे ठोकून दिले. मात्रा बरोबर लागू पडली. शरद राव जॉर्जशी बोलले असावेत. मला लगेच भेटायला यायला सांगीतले.


मी दुस-या मिनिटाला शरद रावांच्या ब्लॉकमध्ये. आत खरीच मिटिंग होती. मात्र ती आटोपली होती. जॉर्ज समोर आले, मी त्यांना कुडाळमधील त्यांच्या व दंडवतेंसोबतच्या माझ्या चर्चेची आठवण करुन दिली. त्यांनी ओळखले असावे, 'बोल, काय निरोप आहे नानांचा?' . . . त्यांचा थेट प्रश्न. मी म्हटलं, ' काहीच नाही. 'सकाळ' दैनिकाच्या कोकण रेल्वेवरील पुरवणीसाठी तुमची मुलाखत हवी आहे! फक्त दहा मिनिटे द्या!' 


ते हसले. ठिक आहे म्हणाले. मी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. एका कॉटवर आमनेसामने बसून ही मुलाखत सुरु होती. त्यांची सटासट उत्तरे येत होती. अचानक ते 'स्टॉप' म्हणाले. मी चकीत! म्हणाले, 'झाली दहा मिनिटे, वेळ संपली!' मी हिरमुसला झालो. जॉर्ज उठले, मी उठलो. मला फारसे काही हाती लागले नव्हते. मी दरवाजापर्यंत गेलो. तेवढ्यात जॉर्ज नी मला परत बोलावले, म्हणाले, ' मित्रा! अशी दहा मिनिटे कधी कोणा राजकारण्याकडे मागू नकोस.  दहा मिनिटात मुलाखत घेऊन 'हा' मुलाखतीला न्याय कसा देणार, अशी भावना निर्माण होते. आम्हा राजकारण्यांना प्रसिद्धी हवीच असते. मुलाखतीसाठी तासभर वेळ माग. राजकारणी खूश होतील!' जॉर्जनी मला एक नवा मंत्रच दिला. नंतर जवळपास तासभर त्यांनी मला भरभरुन मुलाखत दिली. मी प्रश्न न विचारता देखील त्यांनी रेल्वेसंदर्भातील अनेक रहस्यांचा भेद केला. अनेकांना उघडे पाडले. नंतर ही मोठी मुलाखत 'सकाळ'च्या त्या पुरवणीत पहिल्या पानावर सविस्तर प्रसिद्ध झाली.


माझ्यासोबतचा तो रिपोर्टर चकीत झाला होता. जॉर्जनाही माझी युक्ती भावली होती. 


अरविंद शिरसाट


No comments: