Tuesday, November 17, 2020

;

          

      २८ जून २०२० ला ' ब्लॉगर ' सारख्या डिजिटल माध्यमावर सुरू झालेल्या या ' सुक्यो गजालींमधील ', ' १११ ' वी गजाल काल लिहिली. बाबांनी सुमारे ४००० ते ५००० सुक्यो गजाली आजपर्यंत लिहिल्या ! त्यासमोर ' १११ ' हा आकडा नगण्यच !

  ' सुक्यो गजालींची ' व्याख्या बाबांनी खालीलप्रमाणे केलेली,
       
  ' गजालीन खाल्लो घो, आणि वासग्यान पळयली बायल !'
      ही म्हण ठावक नाय, असो मालवणी माणूस शोधून सापडाचो नाय !
             "मालवणी बायल माणसा काय आणि पुरुष काय, अंगमेहनतीचा काम करुक नको; गजाली मारण्यात पटाईत. ह्या गजालींच्या नादात मालवणी माणसान आपला प्रचंड नुकसान करून घेतलासा. 
        मालवणी माणूस गजालींच्या नादात स्वताक इसरान जाता. म्हणून ही म्हण पडली आसाक होयी. गजाली सोडून दिवन प्रत्यक्ष कृती जोपर्यंत तो करना नाय, तवसर मालवणी मुलखाचा काय खरा नाय !
            पण मालवणी माणसांचे हे गजाली आयकन्यासारखे आसतत. तेच हे ' सुक्यो गजाली '!!"
         
        सुक्यो गजाली रोज संध्याकाळी सात ते साडे सात या वेळेत बाबा मोबाईलवर लिहायचे. आठ वाजल्यानंतर मी ती वाचायचो आणि त्यानुसार चित्र काढायला घ्यायचो. चित्र १० ते १५ मिनटांत काढून ह्वायलाच हवं, असा बाबांचा सततचा आग्रह असायचा. मला मात्र अर्धा ते पाऊण तास काही केल्या लागायचाच !
              
       नंतर दहा ते साडे दहाच्या दरम्यान, चित्र अपलोड केलेली गजाल ते ड्राफ्टस मध्ये सेव्ह करून, बरोब्बर अकरा वाजता पोस्ट करायचे ! एका मिनिटाचा पण विलंब त्यांना आवडत नसायचा. त्यानंतर दोन ते तीन मिनटं, त्या गजालीची लिंक स्टेटसला ठेवण्यात व ओळखीच्यांना पाठवण्यात जायची.

    २२ ऑगस्ट ला ' . . .मम देव देव ! ' ही त्यांनी शेवटची, ५६ वी गजाल लिहिली.

      नंतर जवळपास एका महिन्याने, म्हणजेच २० सप्टेंबरला मला २००९ च्या, गजाली लिहिलेल्या तीन डायऱ्या कपाटात खासगी कागदपत्र शोधताना सापडल्या. २३ सप्टेंबरला मी त्यांतील 
' निगेटिव्ह ' ही गजाल ब्लॉगवर अपलोड केली. ती होती ५७ वी गजाल ! नंतर - नंतर हा आकडा ' ७५ ' पर्यंत पोहोचला. त्यानंतर '१००'!! व कालच ' १११' वर ! गजालींना वाचकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला.
 
            गेल्या दोन - अडीच महिन्यांत या गजाली माझ्या जीवनाचा एक भागच बनलेल्या. पण सांगायला दुःख होतं, की आज या गजाली लिहिणं मला थांबवावं लागतंय. कारण, येत्या २३ नोव्हेंबरला राज्यातील शाळा सुरू होत आहेत. माझी पण शाळा सुरू होईल. त्यामुळे गजालींना पुरेसा वेळ देता येईल का, याबद्दल मनात संभ्रम आहे.

 . . .पण, माझी SSC ची परीक्षा झाल्यावर लगेचच मी सुक्यो गजाली लिहिणं परत सुरू करेन. तोपर्यंत हा अर्धविराम ;
   . . . . . . . . . . .
- आर्य अरविंद शिरसाट
   (१७/११/२०२०)
    

6 comments:

प्रशांत मठकर said...

आर्य, तू बाबाच्या गजाली बाबाच्या पश्चात चालू ठेवल्याबद्दल तुझं कौतुक करावे तेवढं थोडंच.स्वत:वरच्या जबाबदारीची जाणीवही या वयात तुला आहे हेही वाखाणण्याजोग आहे.आता अभ्यास महत्वाचा.त्यावर तू पूर्णपणे लक्ष केंद्रित करशीलच.तुझा अर्धविराम अगदी योग्य आहे. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

aryamadhur said...

धन्यवाद काका!🙏

Unknown said...

आर्य, अगदी योग्य आणि अचूक निर्णय तू योग्य वेळी घेतलास. आता या क्षणाला अभ्यासात लक्ष केंद्रित करणे अत्यन्त जरुरीचे आहे.
तसं तुला काहीं सांगायची गरज नाही म्हणा!
तु समंजस आहेस.
आता परीक्षा संपल्यानंतर लगेचच भेटू.
सुक्या गजालीच्या माध्यमातून.
तोपर्यंत ऑल द बेस्ट, तुझ्या अभ्यासासाठी!👍

aryamadhur said...

धन्यवाद!🙏🙏

Shreyas Vengurlekar said...

Arya....🤝🤝👏👏👏👏👏bhari ...chan lihilai..👍👍

aryamadhur said...

Thanks shreyas